सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शाळेतील शिक्षकांकडून मला चांगले ज्ञान, संस्कार व प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. शिक्षकांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही, अशी कृतज्ञ भावना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी व्यक्त केली.
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्याशी बातचीत करताना त्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणी व काही प्रसंग कथन केले. ते म्हणाले, मी हैद्राबाद येथील विद्यारण्या विद्यालयात शालेय शिक्षण घेतले. शाळेतल्या शिक्षिका शांता रामेश्वरराव यांनी वैयक्तिक लक्ष देऊन माझा अभ्यास पूर्ण करून घेतला. शिस्त आणि प्रेरणा या दोन्ही बाबी मी त्यांच्याकडून शिकलो.
मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत आली....
उस्मानिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना एक चांगले प्राध्यापक म्हणून मला प्रा.राजा रेड्डी हे लाभले. मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत तसेच सगळ्यांना समान वागणूक देण्याची, त्याचबरोबर कुणी लहान मोठे नसते, एवढेच नव्हे तर सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची प्रेरणा आपणास प्रा. राजा रेड्डी यांच्याकडून मिळाली. लहानपणापासून खूप चांगले शिक्षक भेटत गेले आणि त्यांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनातून आपण कुलगुरू पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला, असे प्रा.ई.वायुनंदन यांनी सांगितले.
सर्वांना साेबत घेऊन चालावे
शिक्षक, प्राध्यापकांनी जी शिकवण दिली. त्याप्रमाणे आपण आयुष्य जगत आहे. इतरांनी सुध्दा ज्या पदावर आहेत. त्या पदाला कधीही 'पॉवर' समजू नये. प्रत्येकाला समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्या सोडविणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हे महत्त्वाचे आहे. इतरांनी सुध्दा याप्रमाणे आपली वाटचाल सुरू ठेवावी, असा सल्ला प्रा.ई.वायुनंदन यांनी दिला.