निवेदनात म्हटले आहे की, केळी व्यापारी शेतकऱ्यांकडून बोर्ड भावापेक्षाही शंभर दोनशे रुपये कमी भावाने केळी खरेदी करतात. चायना माल आहे, रास फरक देणे बंद केले आहे. वाहतूक मजुरी जास्त लावणे अशी अनेक प्रकारे केळी व्यापारी मनमानी करीत असल्याच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात येत असून त्यांनी शेतकऱ्यांना खरा न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या केळीची रक्कम दररोजच्या बोर्ड भावाप्रमाणे व्यापाऱ्यांकडून बोर्डाच्या भावानुसार देण्यात प्रत्यक्षात कृती करावी. म्हणजे रोजच्या केळी भावाच्या बोर्डानुसार जे केळी व्यापारी शेतकऱ्यांना जी रक्कम अदा करतील त्यांच्या धनादेश किंवा शेतकऱ्याला तो केळी व्यापारी किती रक्कम देत आहे याची नोंद बाजार समितीमध्ये झाल्यास पारदर्शी व्यवहार होतील, अशी केळी उत्पादकांची भूमिका आहे.
काही ठिकाणी मापात पाप
तसेच केळीचे काही व्यापारी तर केळी मोजतांना मापात पाप करून शेतकऱ्यांच्या अंदाजे पाच ते सहा क्विंटलचा केळीचा माल जास्त घेत असतात. ही वस्तुस्थिती तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना माहीत असतानासुद्धा सर्रासपणे शेतकऱ्यांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर केळी व्यापारी जगत असतानाही केळी उत्पादक शेतकऱ्यांना नाना प्रकारे कारणे सांगून भाव पाडले जात आहेत. कधी कोरोनाचे कारण तर आता तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यामुळे केळीला उठाव नाही अशी अजब कारणे व्यापारी दाखवत आहेत. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने या केळी व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असतानाही ही प्रत्येक तालुक्यात अवैध व बिना परवाने केळी व्यापाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पैसा डुबण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. केळी व्यापाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक काटे वापरण्याचे बंधन असतानाही कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. केळीला कट्टी लावली जात आहे. जाहीर बोर्डापेक्षा कमी भावात केळी खरेदी केल्यास केळी व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून केळी व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्यात यावा
व सर्व व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटाचे मोजमाप करावे असे असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष देत नाही. तरी लवकरात लवकर केळी व्यापाऱ्यांवर वेळीच जिल्हा उपनिबंधक यांनी कारवाई करावी.
अन्यथा शेतकरी संघटना संपूर्ण जिल्ह्याभरात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष जळगाव संजय महाजन, उपजिल्हाध्यक्ष किरण गुर्जर, तालुकाध्यक्ष सचिन शिंपी आदी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.