चाळीसगाव- पुराने घातलेल्या थैमानानंतर मनुष्य, जनावरे व मालमत्ता यांची मोठी हानी तालुक्यात झाली आहे. त्यापाठोपाठ शेतीचे झालेले प्रचंड नुकसान समोर येत आहे. काही ठिकाणी पिकांचा फक्त बुडकाच उरलेला तर कपाशी,ऊस व इतर पिके पूर्णतः जमीनदोस्त झालेली अशी भयानक अवस्था या तालुक्यातील अनेक गावातील शेतीची झालेली आहे.
शेतीवर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील तीस ते पत्तीस शेतकऱ्यांना या पुराचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.या गावातील शेतकरी विठाबाई रामदास पाटील या महिला शेतकरी यांची डोक्यापर्यंतची आलेली कपाशी या पुरात वाहून गेली आहे. आधीच दुष्काळाला तोंड देत शेतकऱ्याने जिवापाड जपलेले,हातातोंडाशी आलेल्या कपाशी या पुराच्या तडाख्यात पाण्यात वाहून गेली आहे. तर काहींचे आडवे पडले, जे वाचले त्याचाही दर्जा घसरला. त्यामुळे त्याचे मोलही बळीराजाच्या पदरी पडेल, याची शाश्वती नाही, हे यातून प्रकर्षाने जाणवले.
विठाबाई रामदास पाटील यांच्या दीड एकरमध्ये कपाशी व वांगेची लागवड केली होती. डोक्यावरपर्यंत आलेल्या कपाशीला २५ ते ४० टक्के पक्क्या कैऱ्या (बोंड) आलेले होते. वांगेचेही दोन बहार आले होते. शेतात ठिबकद्वारे पिकांना पाणी देत असल्यामुळे पिके चांगल्या प्रकारे फुलली होती. जिवापाड जपलेले व हातातोंडाशी आलेली कपाशी पुराच्या तडाख्याने वाहून गेल्याने या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
ठिबकच्या नळ्या गायब
यापुरात ठिबकच्या सर्व नळ्या व शेतातील ठिबकच्या नळ्याचा बंडलही वाहून गेला आहे, तसेच विहिरीला भगदाड पडल्याने नुकसान झाले. मोटारही वाहून गेली. या लागवडीसाठी त्यांना सुमारे एक लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे.
याबरोबरच वाघळी येथील मधुकर बळीराम पाटील यांच्या दीड एकर शेतीतील कपाशीची तर दपाडू भानुदास पाटील यांच्या तीस गुंठ्यांवरील क्षेत्रातील ऊसाची ही अशीच अवस्था पाहायला मिळाली.अश्याप्रकारे वाघळी गावातील तीस-पत्तीस शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.गुरुवारी कृषी विभागाने या शेतातील पंचनामे केली आहेत.
दरम्यान, अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी गावात येऊन भेटी दिल्या; परंतु नुकसानग्रस्त शेतीकडे कुणी फिरकले नाही, याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
या घटनेमुळे आता शेतीत गुंतवलेले पैसे सर्व पुरात वाहून गेले आहे.आता पेरण्यासाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर
आणखी वाढला असून हे कर्ज फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे.
शेती करण्यासाठी आता पैसा आणायचा कोठून, असा सवाल शेतकरी करीत आहेत. शासनाने जाहीर केलेली मदत लवकर मिळावी, या आशेवरच शेतकरी अवलंबून आहे.
काही ठिकाणी शेतजमिनीत पाणी साचून आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून येणाऱ्या मदतीवर अवलंबून राहून शेतीची मशागत नव्याने करावी लागणार आहे. या उत्पादनातून मोठा फायदा मिळण्याचा विश्वासही यापुरात वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा शेतजमिनी तयार करून उत्पादन घेणे मोठे आव्हान आहे.
फोटो
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील विठाबाई रामदास पाटील यांच्या शेतातील कपाशीचे पीक पुरात वाहून गेल्यानंतर शेताची झालेली अवस्था.