जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकारने तात्काळ कारवाई करण्यासह मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करण्याची मागणीसाठी शुक्रवारी गोरसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यानांही निवेदन देण्यात आले.
गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संयुक्त पुर्व परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे बार्टीच्या धर्तीवर सारथी प्रमाणे महाज्योतीला तीन हजार करोड रूपये निधी उपलब्ध द्यावा, १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती अधिनियमान्वये जुनी पेंन्शन लागू करावी, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संजय चव्हाण, सुभाष जाधव, माधव चव्हाण, चेतन जाधव, कैलास पवार, नंदू चव्हाण, सुनील चव्हाण , राहुल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.