जामनेर : आमदार संजय राठोड यांचा आरोप
जामनेर, जि. जळगाव : वसंतराव नाईक महामंडळास एक हजार कोटी रुपये देण्याची शासनाने केलेली घोषणा पूर्ण होऊ शकली नाही, इतर समाजास, महामंडळांना शासन निधी देते; मात्र गोरबंजारा समाजावरच अन्याय का? आरक्षणाबाबतही समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप माजी वनमंत्री आमदार संजय राठोड यांनी सोमवारी " लोकमत" शी बोलताना केला.
राठोड हे सोमवारी जामनेर तालुक्याच्या भेटीवर आले होते. तालुक्यातील गोरबंजारा समाजाच्या तांड्यावर त्यांनी भेट देत ग्रामस्थांशी
संवाद साधला. त्यावेळी राठोड यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘आम्हाला कुणाच्याही ताटातले नको, आमचे हक्काचे तेव्हढे द्या. व्हीजेएनटीमधील मूळ डाटानुसार आरक्षण मिळाले पाहिजे. आजपर्यंत १० आयोगांची स्थापना झाली, मात्र पदरात काहीच पडले नाही. समाजाची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. अति मागासलेले असा उल्ल्लेख इंग्रजांनी केला होता. एसटी संवर्गाच्या साडेसात टक्के आरक्षणाला धक्का लागू न देता गोरबंजारा समाजाला एसटी ब संवर्गात समावेश करून आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.
शासनाने समाजाचे पदोन्नतीचे आरक्षण थांबविले, व्हीजेएनटीतील परिवर्तनीय बिंदू आम्हाला नको. आजही समाजबांधव सामाजिक व आर्थिक मागासले असून, उच्च शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहिले आहे. नाईक महामंडळास निधी मिळत नसल्याने उद्योग व्यवसायापासून समाजातील युवक वंचित राहिले आहेत. राज्य शासनाने आरक्षणाबाबत शिफारस करून केंद्राकडे पाठविली पाहिजे, ही आमची मागणी यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानादेखील केली होती व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेदेखील केली असल्याचे ते म्हणाले.