जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुवर्णबाजारात उलट चित्र दिसत असून अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने सोने-चांदी स्वस्त होत आहे तर डॉलर वधारल्यास सोने-चांदीत घसरण होत आहे. अशाच प्रकारे बुधवारीदेखील डॉलर घसरला असताना चांदीच्या भावात दोन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती पुन्हा ७० हजारांवर पोहचली. तसेच सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ५०० रुपयांवर पोहचले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील डॉलरच्या दराचा होणारा परिणाम या वेळी सुवर्णबाजारावर उलटप्रकारे होताना दिसत आहे. एरव्ही डॉलरचे दर वधारल्यास सोने-चांदी महाग होते. मात्र गेल्या आठवड्यापासून यात उलटफेर होत आहे. सट्टाबाजारातील खेळीमुळे अस्थिरता निर्माण झाली असल्याचे दररोज चित्र आहे. गेल्या आठवड्यात २२ फेब्रुवारी रोजी डॉलरचे दर कमी होऊन ७२.३९ रुपयांवर आले असताना त्या दिवशी चांदीत ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७० हजार ५०० रुपयांवर पोहचली होती तर सोन्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ४७ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी डॉलर वधारुन ७३.०५ रुपयांवर गेला असता चांदीत ५०० रुपयांची व सोन्यातही ५०० रुपयांनी घसरण झाली होती. २७ रोजी डॉलरमध्ये पुन्हा वाढ झाली त्या वेळी चांदीत एक हजार ५०० रुपयांनी तर सोन्यात ५०० रुपयांनी घसरण झाली होती. १ मार्च रोजी डाॅलर घसरुन ७३.३८ रुपयांवर आला त्या वेळी चांदीत एक हजाराने तर सोन्यात ४०० रुपयांनी वाढ झाली. २ मार्च रोजीदेखील डॉलरचे दर काहीसे वाढून ते ७३.४० रुपये झाले त्या वेळीही चांदीत एक हजार ५०० रुपयांनी तर सोन्यात ८०० रुपयांनी घसरण झाली.
पुन्हा मोठी वाढ
३ मार्च रोजी तर चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ झाली. बुधवारी डॉलरचे दर ७२.८१ रुपयांवर आले असताना चांदीच्या भावात दोन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
आठवडाभरातील चढ-उतार
दिनांक सोने चांदी डॉलरचे दर
२२ फेब्रुवारी ४७,५०० ७०,५०० ७२.३९
२६ फेब्रुवारी ४७,१०० ७०,००० ७३.०५
२७ फेब्रुवारी ४६,६०० ६८,५०० ७३.६०
१ मार्च ४७,००० ६९,००० ७३.३८
२ मार्च ४६,२०० ६७,५०० ७३.४०
३ मार्च ४६,५०० ७०,००० ७२.८१