लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डेंग्यू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका सहयोगी प्राध्यापकास अन्य त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जीएमसीत त्यांना आवश्यक त्या सुविधा नसल्याने त्यांना खासगीत हलविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्या एका डॉक्टरांना आठवडाभरापूर्वी डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवातीला सामान्य कक्षात व नंतर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी त्यांना हृदयासंबंधी त्रास समोर आल्यानंतर शिवाय त्यासाठीचे उपचार व तपासण्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डेंग्यूचे रुग्ण वाढले
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. यासह जिल्हाभरातच संशयित रुग्णांची संख्या वाढून १०४ वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.