जळगाव : कोरोनानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नॉन कोविड यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी आता परिस्थिती सामान्य झाली आहे. गेल्या चार दिवसांत या रुग्णालयात ९५० विविध रुग्णांनी तपासणी करून उपचार घेतले आहेत. अन्य तीन दिवसांच्या तुलनेत सोमवारी रुग्णालयात गर्दी वाढली होती.
कोरोनाचा संसर्ग घटल्यानंतर, शिवाय नॉन कोविड यंत्रणेची मागणी वाढत असल्याने २२ जुलैपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड यंत्रणा सुरू करण्यात आली. या ठिकाणी गंभीर कोविड रुग्णांसाठी जुना अतिदक्षता विभाग राखीव ठेवण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांतील एकत्रित परिस्थिती बघता आपत्कालीन विभागातील अतिदक्षता विभाग हा खालीच असून, रुग्णांना नियमितप्रमाणे विविध कक्षांमध्ये दाखल केले जात आहे.
रुग्णांना दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून नॉन कोविड यंत्रणा बंद असल्याने कोविडव्यतिरिक्त उपचारांसाठी शासकीय यंत्रणेत जळगावात सुविधा नसल्याने रुग्णांची फरपट होत होती. मात्र, ही यंत्रणा सुरू झाल्याने गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी सर्वच तपासणी कक्षांमध्ये गर्दी झालेली होती. आपत्कालीन कक्षात एका महिलेला दाखल करण्यात आले होते.
असे झाले उपचार
२२ जुलै : ३२०
२३ जुलै : २०६
२४ जुलै : १५०
२५ जुलै : ३५०