जळगाव : पोलिसात दिलेली फिर्याद मागे घेत नसल्याने सुचिता दीपक पाटील (१७) या तरुणीच्या दंडावर चावा घेऊन मारहाण केल्याची घटना शनी पेठेतील चौघुले प्लॉट भागात शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. या प्रकरणी पूनम आनंदा सपकाळे, दिलीप विश्वनाथ सपकाळे व खुशाल पितांबर सोनार (रा. ओक नगर, चौघुले प्लॉट) यांच्याविरुद्ध शनिवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.
शिक्षिकेची ५० हजारांची ऑनलाइन फसवणूक
जळगाव : डॉमिनॉज पिझ्झाची ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इंटरनेटवरून संपर्क क्रमांक मिळविल्यानंतर संबंधित व्यक्तीने लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करायला सांगून शिक्षिकेची ऑनलाइन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिमी शरद दुबे (वय २८, रा. जीवन विकास कॉलनी) असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळ्यात तरुणाचा मृत्यू
जळगाव : पिंप्राळा हुडको येथे नजीर खान अहमद खान (४०) या तरुणाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. नातेवाइकांनी नजीर यांना ५ फेब्रुवारी रोजी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी दिलेल्या माहितीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
गेंदालाल मिल भागातून तरुणी बेपत्ता
जळगाव : गेंदालाल मिल भागातून शबिना शेख मोहम्मद इकबाल (२८) ही तरुणी २९ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली. या प्रकरणी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार रईस शेख हे करीत आहेत.
धानवड विकासो चेअरमनपदी प्रा. राजू पाटील
फोटो..
जळगाव : तालुक्यातील धानवड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रा. राजू उर्फ पांडुरंग पाटील यांची तर व्हाईस चेअरमन रंगनाथ यशवंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार अधिकारी दीपक पाटील निवडणूक अधिकारी होते. या वेळी संचालक दिगंबर पाटील, प्रवीण पाटील, भरत चव्हाण, किसन राठोड, जनार्दन राठोड, नानाभाऊ पाटील, आत्माराम पाटील, रवींद्र पाटील, अरुण सोनवणे, कलाबाई पाटील, जीजाबाई पाटील आदी उपस्थित होते.