यवत : खामगाव फाटा (ता. दौंड) येथील रेल्वे मार्गावर रेल्वेने ट्रॅक्टरला ठोकरल्याने झालेल्या अपघाताच्या पोलीस तपासात रेल्वे फाटकाचा गेटमन जयपाल यादव हाच प्रथमदर्शनी दोषी आढळला असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीसदलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. लोहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि. ३) अपघात घडला, त्या वेळी दोन रेल्वेचे क्रॉसिंग होत असताना एक रेल्वे फाटकापासून गेल्यानंतर गेटमन जयपाल यादव याने दुसरी रेल्वे जाण्याआधीच रेल्वेचे फाटक उघडले असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यामुळे गेटमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर केले असता ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अपघातासंदर्भातील इतर तांत्रिक चुका झाल्या होत्या का? किंवा याला जबाबदार कोण? याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार असल्याचे मनोज लोहिया यांनी सांगितले. (वार्ताहर)
यवतच्या रेल्वे अपघातप्रकरणी गेटमन दोषी : पोलीस अधीक्षक
By admin | Updated: May 6, 2014 14:23 IST