लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारी संत्री आणि मोसंबी ही फळे सध्या बाजारात फक्त औषधापुरतीच दिसत आहेत; तर मंगळवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबूची आवक फक्त २५ क्विंटल एवढीच झाली होती. तसेच बाजारातील ज्या विक्रेत्यांकडे ही फळे उपलब्ध आहेत, त्यांनी त्याचे दर गगनाला नेऊन ठेवले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि भडगाव या भागात संत्री आणि मोसंबीच्या बागा आहेत. असे असले तरी काही विक्रेते जालना आणि नागपूर या भागांतून मोसंबी आणि संत्री मागवितात. त्यामुळे शहरात पुरेशी संत्री- मोसंबी उपलब्ध असतात. मात्र सध्या स्थानिक पातळीवर संत्री आणि मोसंब्यांचे उत्पादनच नाही. स्थानिक माल बाजारात मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येईल. बाहेरून येणाऱ्या मालाची सध्या पुरेशी आवक नसल्याने संत्री आणि मोसंब्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
संत्री, मोसंबी आणि लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या सध्या कोरोनाच्या काळात या फळांची विक्री जास्त प्रमाणात होत आहे. बाहेरील जिल्ह्यांमधून ज्या व्यापाऱ्यांकडे माल येतो, तेच व्यापारी गोलाणी मार्केटमधील फळबाजारात त्याची विक्री करीत आहेत. इतर ठिकाणी संत्री आणि मोसंबी फारशी दिसून येत नाही.
प्रतिकिलो दर
फेब्रुवारी मार्च एप्रिल
लिंबू २० रु. २५ रु. ४० रु.
मोसंबी - ७० रु. ९० रु.
संत्री ८० रु. ११० रु. १२० रु.
मोसंबी मराठवाड्यातून, संत्री विदर्भातून, लिंबू स्थानिक शेतकऱ्यांतून
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, चोपडा यांसह काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी संत्री आणि मोसंब्यांची लागवड केली आहे. मात्र सध्या स्थानिक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये झाडांना लागलेली फळे ही काढणीसाठी योग्य झालेली नाहीत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील काही व्यापारी मराठवाडा, तर संत्री विदर्भातून आणत आहेत. त्यामुळे त्यांचे भावदेखील वधारलेलेच आहेत. जळगाव जिल्ह्यात लिंबू मात्र चांगल्या प्रमाणात घेतले जातात. हेच लिंबू बाजारात विक्रीसाठी येतात.
इम्युनिटी वाढते
संत्री, मोसंबी या फळांमधून व्हिटॅमिन सी मिळते. कायमच कामासाठी बाहेर फिरावे लागते. त्यामुळे मी या फळांचे नियमित सेवन करतो. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते.
- तेजस अकोले
सध्या उन्हाळा असल्याने लिंबूपाणी पीत असतो. त्यासोबतच संत्रीदेखील खातो. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सध्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढणे गरजेचे आहे.
- नीतेश माहूरकर
सध्या कोरोनामुळे संत्री आणि मोसंबी ही फळे खाणे लाभदायक आहे. आम्ही घरात दररोज ही फळे खातो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, लिंबूपाणीदेखील पितो.
- दीपक चौधरी
----
कोरोना रुग्णांनादेखील संत्री आणि लिंबूचा आहारात समावेश केला जातो. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या काढ्यात लिंबूचा वापर केला जातो. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
- डॉ. अश्विनी धताते, आहारतज्ज्ञ