लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या हद्दीत जळगाव तालुक्यातील आव्हाणे, कुसूंबा, मोहाडी, सावखेडा व मण्यारखेडा या गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याबाबतचा ठराव महापालिकेत करण्यात आला होता. आता ठरावाला विरोध करत जळगाव पंचायत समितीच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत महापालिकेच्या ठरावाविरोधात ठराव करून, पाच ही गावांचा समावेश मनपा हद्दीत होवू देणार नाही असा ठराव बहूमताने मंजूर करण्यात आला आहे. याबाबतीत ग्राम विकास मंत्र्यांकडे देखील जाण्याची तयारी पंचायत समिती सदस्यांनी केली आहे.
सोमवारी सभापती नंदलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचाय समितीची सभा घेण्यात आली. या सभेत उपसभापती संगीता चिंचोरे, सदस्य ॲड.हर्षल चौधरी, यमुना रोटे, जागृती चौधरी, विमल बागूल, ललिता पाटील, ज्योती महाजन, निर्मला कोळी यांच्यासह बीडीओ शशिकांत सोनवणे आदी उपस्थित होते. सदस्य हर्षल चौधरी यांनी हा प्रस्ताव सभेपुढे मांडला होता. सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला बहूमताने मंजूर करून हा ठराव मंजूर करून घेतला आहे. दऱम्यान, याबाबत जिल्हा परिषदेला देखील हा प्रस्ताव दिला जाणार असून, त्याठिकाणीही हा ठराव मंजूर करून, मनपाचा ठराव रद्द करण्याबाबत देखील पाठपुरावा केला जाणार आहे. पाचही गावांच्या ग्राम पंचायत प्रशासन व सदस्यांकडून मनपाने केलेल्या ठरावाला विरोध केला आहे. जळगाव शहराचा विकासच करता आला नसताना गावांचा काय विकास करतील अशी प्रतिक्रिया सभापती नंदलाल पाटील यांनी दिली आहे.