ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 22 - म्हसवे (ता.पारोळा) गावानजीकच्या नाल्याला आज पुर आला. या पुरातून बैलगाडी काढण्याच्या प्रयत्नात बैलगाडीसह पाचजण वाहून जात होते. मात्र तरूणांनी पुरात उड्या मारुन पाचही जणांचे प्राण वाचविले. मात्र या घटनेत एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी दुपारी दोन वाजता घडली.
म्हसवे येथील विलास पुरुषोत्तम शिंपी (४०) हे सकाळी शेतात गेले होते. दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाला. शेतातील वाफ मोडल्याने ते बैलगाडीने गावाकडे येत होते. त्यांना गावातील निलाबाई सुभाष पाटील, पुंजाबाई पाटील, सुमनबाई कन्हैय्यालाल पाटील, रेखाबाई विलास शिंपी या भेटल्या. त्या महिलांना बैलगाडीत बसवून येत असताना म्हसवे गावाजवळील नाल्याला पूर आला आला. विलास शिंपी यांनी पाण्यात गाडी टाकताच पुराचा प्रवाह वाढल्याने बैलगाडी उलटून त्यातील पाचही जण वाहू लागले. त्याठिकाणी म्हसवेचे तरुण सतीश विनायक पाटील, अजय बापू पाटील, शुभम संभाजी पाटील, किसन रतन गायकवाड, संजय विनायक पाटील, कल्पेश ताथू पाटील, नंदू भीमराव पाटील आदी तरुणांनी पुराच्या पाण्यात उड्या घेत चार महिला व एका पुरुषाला वाचविण्यात यश आले.यातील रेखाबाई शिंपी यांची प्रकृती जास्त असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले. बैलगाडीने पुराच्या पाण्यात चार, पाच वेळेस उलटल्याने एका बैलाला ज्योतचा फास लागल्याने बैलाचा मृत्यू झाला.