अमळनेर : शहरातील जुन्या बस स्टॅण्ड भागात चोरट्यांनी पुन्हा पाच दुकाने फोडली. मात्र एकाच दुकानातून १२०० रुपये किमतीचे दोन मोबाइल संच लांबविण्यात चोरटे यशस्वी झाले. २१ रोजी रात्री ही घटना घडली. गेल्या १० दिवसांतील या भागातील ही दुसरी घटना असून, याआधी आठ दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला होता.२१ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी के. आर. ट्रेडिंग दुकान फोडून त्यातील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. अंबर हॉटेल मागील विटांचे बांधकाम फोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला तर वरून ट्रेडिंग, जितू मोबाइल या दुकानांचे शटर व कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. निरंकरी मोबाइल या दुकानातून १२०० रुपये किमतीचे दोन मोबाइल संच चोरट्यांनी लांबविले आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मिलिंद भामरे, ईश्वर सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. गेल्या १० दिवसात १३ दुकाने एकाच भागात फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. या भागात पथदिवे नसल्याने चोरट्याना फावत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. दुकानदारांनीदेखील रात्री बाहेर लाईट सुरू ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुन्हा पाच दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 21:28 IST