जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी तब्बल ३४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, या ‘मेगाब्लॉक’च्या काळात जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील २ किलोमीटरपर्यंत सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉकच्या काळात ज्या ठरावीक रेल्वे गाड्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत, त्या गाड्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी रेल्वेचे कर्मचारी ठिकठिकाणी तैनात राहून, या गाड्यांवरील लोकोपायलटला सूचना देऊन सिग्नल यंत्रणेची जबाबदारी पार पाडणार आहेत. तसेच या गाड्या सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे अत्यंत संथ गतीने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सध्या जळगाव ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या तिसऱ्या मार्गामुळे भुसावळ ते जळगावदरम्यान गाड्या विलंबाने धावण्याचे प्रमाण कमी होणार असून, प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे. दरम्यान, या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे १६ व १७ जुलै रोजी जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत काही ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बदल तर काही ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा टाकणे, गाड्या ‘टर्मिनेट’ होण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारणे आदी तांत्रिक कामे केली जाणार आहेत. या कामासाठी ३४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला असून, तीन शिफ्टमध्ये हे काम चालणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाचे मुख्य अभियंता सुधीर पटेल व दूरसंचार विभागाचे मुख्य अभियंता अखिलेश मिश्रा यांनी जळगावी येऊन, या कामाचा आढावा देखील घेतला.
इन्फो :
रात्रीच्या कामासाठी अद्ययावत प्रकाशयोजना :
रेल्वे प्रशासनातर्फे सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी ३४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला असून, रात्रीदेखील हे काम सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या कामासाठी ठिकठिकाणी पथदिवे उभारून, अद्ययावत प्रकाशयोजना ठेवण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय याच ठिकाणी होणार असून, रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे रुळालगत मंडप टाकण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना काहीवेळ विश्रांती घेता येणार आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून या कामाला सुरुवात होणार असून, शनिवारी रात्री आठपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.
इन्फो :
असोदा व भादली गेट बंद राहणार :
रेल्वे प्रशासनातर्फे मेगाब्लॉकचे संपूर्ण काम जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत होणार आहे. त्यामुळे असोदा रेल्वे गेट व भादली रेल्वे गेट काम संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दहापासूनच हे दोन्ही गेट बंद करण्यात येणार आहेत. गेट बंद केल्यानंतर या ठिकाणी रेल्वे पोलिसांची नियुक्तीही करण्यात येणार आहे. तसेच शक्य झाल्यास पिंप्राळा रेल्वे गेटही बंद ठेवण्याचे नियोजन सुरू असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
इन्फो :
कामाच्या ठिकाणी सर्व अधिकारी तळ ठोकून राहणार :
मध्य रेल्वे मार्गावरील हा सर्वांत मोठा मेगाब्लॉक असून, अत्यंत जोखमीचे हे काम राहणार आहे. रेल्वेची बहुतांश सुरक्षा ही सिग्नल यंत्रणेवरच अवलंबून राहत असल्यामुळे या सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती व नवीन सिग्नल यंत्रणा टाकण्याचे तांत्रिक काम यशस्वी व्हावे, यासाठी मध्य रेल्वेचे मुंबई, नागपूर व भुसावळ विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी मेगाब्लॉकच्या काळात या कामाच्या ठिकाणीच हजर राहणार आहेत. रेल्वे प्रशासनाने या सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी बाहेरून अत्याधुनिक यंत्रणा मागविली असून, सुमारे २०० ते २५० मजूर वर्ग या ठिकाणी काम करणार आहेत.
इन्फो :
रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार :
रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉकमुळे सुमारे २० गाड्या रद्द केल्या असून, गीतांजली, काशी, हावडा, पवन, कुशीनगर आदी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र सुरू ठेवल्या आहेत. या कामाच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद राहणार असल्यामुळे या गाड्या मध्येच थांबणार आहेत. यातील बहुतांश गाड्या या रात्री धावणाऱ्या आहेत. गाडी मध्येच थांबल्यामुळे प्रवाशांच्या सामानाची चोरी-लूटमार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे या घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.