जळगाव : एकनाथराव खडसे हे जोर्पयत मंत्रीपदावर कायम राहतील तोर्पयत पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येसह जिल्ह्यातील वाळू चोरींच्या मुद्दय़ांची चौकशी निष्पक्षपणे होणार नाही. त्यामुळे प्रथम मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा राजीनामा घ्यावा. मग खान्देशबाहेरील अधिका:याकडून या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रपरिषदेत केली. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील वाळू चोरीत एका भाजपा आमदाराचाही सहभाग असल्याचा सनसनाटी आरोप केला. खडसे खोटे बोलतात वाळू माफिया सागर चौधरीशी आपला संबंध नाही. परिचय नाही, असे एकनाथराव खडसे म्हणाले आहे. परंतु त्यांचे व सागर चौधरीचे संबंध असल्याचे अनेक छायाचित्रांमुळे स्पष्ट झाले आहे. खडसे या प्रकरणी खोटे बोलले, असा दावा प्रीती शर्मा मेनन यांनी केला. भाजपा आमदारही वाळू ठेकेदार शर्मा मेनन म्हणाल्या, भाजपा आणि जिल्ह्यातील वाळू माफियांचे साटेलोटे आहेत. जिल्ह्यातील एक भाजपा आमदारही वाळू चोर आहे. तसे ठोस पुरावे आल्यावर त्यांचे नावही जाहीर करू. आव्हाणी येथे अरिहंत एंटरप्रायजेसला वाळू ठेका दिला होता. पण फक्त 19 दिवस हा ठेका चालला. नंतर चेतन शर्मा व राहुल तिवारी यांनी तक्रारी केल्या व हा ठेका रद्द झाला. अरिहंत एंटरप्रायजेसला सात लाख दंडही ठोठावला गेला. नंतर याच आव्हाणी ठेक्यात भाजपाच्या एका व्यक्तीला भागीदार करण्यात आले व हा ठेका सुरू झाला. भाजपाशी संबंधितांना वाळू ठेके दिले जातात. वैजनाथ येथील वाळू ठेका सादरे आत्महत्या प्रकरणातील आरोपी व वाळू माफिया सागर चौधरी व राजेश मिश्रा यांनीही घेतला होता. त्यांना तीन हजार ब्रास वाळू उपशाची परवानगी दिली होती. पण हा ठेका सहा महिने चालला. दरम्यानच्या काळात त्यांना कुठलाही दंड लागला नाही. जिल्ह्यात 29 वाळू ठेके आहेत. त्यांची उपशाची परवानगी तीन हजार ते 3200 ब्रास आहे. पण त्यापेक्षा अधिक वाळू चोरी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.