जळगाव : मोहाडी रस्त्यावरील दौलतनगरातील पिंटू बंडू इटकरे यांच्याकडे ३ फेब्रुवारी रोजी पहाटे पडलेल्या दरोड्याचा सात महिन्यांनी छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक (रा. जालना) व रणजितसिंग जीवनसिंग जुनी (२२, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आणखी चार जणांचा समावेश असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
इटकरे यांच्याकडे पहाटेच्या सुमारास शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम व दागिने असा १८ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला होता. या गुन्ह्यात चार चाकीचा वापर झाला होता. सीसीटीव्ही फूटेजमध्येही संशयित कैद झाले होते, मात्र चेहरे स्पष्ट नव्हते. हा गुन्हा उघडकीस आणणे एक आव्हान होते. जळगावातील टीप देऊन जालन्यातील गुन्हेगारांनी हा गुन्हा केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी याच गुन्ह्यासाठी स्वतंत्र दोन पथके नियुक्त करण्याचे आदेश बकाले यांना दिले होते. या पथकांनी सलग चार महिने जालना, नांदेड व जळगाव अशी संशयितांची माहिती काढली. तीन वेळा तर पोलीस पोहोचण्याआधीच संशयित तेथून पळून गेले होते. शेवटी दोन दिवस जालन्यात मुक्काम ठोकल्यानंतर किशोरसिंग हा जाळ्यात अडकला. अधिकच्या चौकशीत त्याने जळगावातील रणजितसिंग याच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल करून दागिन्यांचे वाटप केल्याचे सांगितले.
सिव्हिलच्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी
याच गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयातील दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एकाला गुरुवारी सायंकाळी सोडण्यात आले. दुसऱ्याची चौकशी सुरूच होती. या गुन्ह्यात त्यांचा नेमका काय संबंध आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र याच गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे बकाले यांनी सांगितले.
यांनी उघड केला गुन्हा
सहायक फौजदार रवी नरवाडे, संदीप पाटील, संतोष मायकल, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, परेश महाजन, मुरलीधर बारी तर दुसऱ्या पथकातील संजय हिवरकर, राजेश मेढे, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, महेश महाजन, किरण चौधरी, प्रवीण मांडोळे व दीपक चौधरी यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. दरम्यान, संशयितांनी ज्यांच्याकडे दागिने मोडले, त्या सराफांनाही पोलिसांनी गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते.