जळगाव : स्थानिक पातळीवर तपासणी होऊन दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे, याबाबत अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवरच तपासणी व्हावी, असा शासन निर्णय असतानाही यासाठी जळगावातच एकच केंद्र असल्याने दिव्यांगांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याचा मनस्ताप अनेक दिव्यांगांना होत आहे. असेच एक मेहूणबारे येथील दिव्यांग शिवाजी जाधव हे मंगळवारीच या केंद्रावर आले होते. बुधवारी तपासणीचा वेळ निघुन जावू नये म्हणून ते एक दिवस आधीच जळगावात आले होते. येथेच त्यांनी रात्र काढली होती. त्यांचे कागदपत्र घेण्यात आली असून लवकरच ती तपासणी होऊन त्यांना प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी दिली. याबाबत लोकमतने बुधवार १३ जानेवारीला वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर यंत्रणेने तातडीने ही कारवाई केली.