लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथील विवाहिता अश्विनी किशोर चौधरी (२८) या महिलेच्या आत्महत्येनंतर तिचा चिमुकला नऊ वर्षीय श्रेयस किशोर चौधरी याचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अश्विनी किशोर चौधरी या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी दोन्ही मुलांना विषारी द्रव्य पाजले असावे, असा पोलीस प्रशासनाचा प्राथमिक अंदाज होता.
या घटनेत प्रणव (३ वर्षे) व श्रेयस (९ वर्षे) यांना उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रणव याची तब्येत बरी झाल्याने त्याला डिस्चार्ज मिळाला होता.
डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असताना श्रेयसची प्रकृती खालावली. त्यामुळे पुढील उपचारार्थ श्रेयसला नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जवळपास आठवडाभराच्या जीवनमृत्यूच्या संघर्षात श्रेयसची अखेर प्राणज्योत मालवली. खंडाळा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात सोमवारी रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी नाशिक येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेथून शासकीय कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तालुक्यात पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद होईल.