तळोदा : नंदुरबार जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळ मयत झाले. तथापि, या मयत बाळाचा मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. तब्बल तीन ते चार तास मृतदेहाची हेळसांड झाली. बाळाच्या नातेवाइकांनी अक्षरश: विनवणी करूनही रुग्णवाहिका देण्यात आली नाही. अखेर खासगी वाहनाने त्या बाळाचा मृतदेह व मातेला घरी आणण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रांझणी, ता. तळोदा येथील आशाबाई युवराज ठाकरे या गरोदर मातेला प्रसूतीसाठी मंगळवारी दुपारी चार वाजता नंदुरबार येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेची प्रसूती बुधवारी पहाटे पाच वाजता झाली. यानंतर बाळ मयत झाले होते. या मयत बाळासोबत मातेला घरी आणण्यासाठी तिच्यासोबत आलेले नातेवाइक व गावातील आशा कार्यकर्तीने जिल्हा रुग्णालयात संबंधितांकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. बाळाचा मृतदेह तब्बल तीन ते चार तास पडून होता. एवढेच नव्हे तर 102 व 108 या रुग्णसेवेच्या वाहनांनादेखील संपर्क साधला. मात्र त्यांनीही होकार दिला नाही. शेवटी बाळाच्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याचे पाहून नातेवाइकांनी महागडय़ा दरात खासगी वाहनाने मृतदेह घरी आणला. वास्तविक गरोदर माता शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तिला घरी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयाची असते. परंतु या आदिवासी महिलेचे बाळ मयतच जन्माला आल्याने तिला व बाळास रुग्णवाहिकेने पोहोचविण्यास स्पष्ट नकार दिला. मयत बाळाला रुग्णवाहिकेने घरी न पोहोचविण्याचे स्पष्ट आदेश असल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले.
गरोदर माता व मयत बाळासाठी रुग्णवाहिका न दिल्याने संताप
By admin | Updated: September 24, 2015 00:37 IST