जळगाव : धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत, एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेपूर्वी आसोदा रेल्वे गेटजवळ घडली. यशवंत हेमराज चौधरी (५५, रा.दशरथनगर, जुना खेडी रोड) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यशवंत चौधरी हे दशरथ नगरात पत्नी मीनाक्षी यांच्यासह वास्तव्यास होते. जळगाव तालुक्यातील आवार शिवारात त्यांची शेती असून, त्यावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी दुपारी अचानक ते आसोदा रेल्वेगटजवळील खांबा क्रमांक ४२१/२५-४२१/२८च्या दरम्यानातील रेल्वे रुळावर आले. नंतर धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
...अन् पत्नीशी झाला संपर्क
रेल्वेसमोर एकाने झोकून देत आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे उपस्टेशन प्रबंधक एस.एस.ठाकूर यांनी काही वेळातच शनिपेठ पोलिसांना कळविली. त्यानुसार, शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेश गव्हाळे व रवींद्र पाटील यांनी क्षणाचा विलंब न करता, घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पाहणी करीत असताना, पोलिसांना एक डायरी मिळून आली. त्यातील एका मोबाइल क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. नेमका तो मोबाइल क्रमांक मयत यशवंत चौधरी यांच्या पत्नीचा असल्याचे समोर आले. त्यांना पोलिसांनी घटनेची माहिती दिली व ओळख पटविण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर, कपड्यांवरून ओळख पटल्यानंतर पत्नीने घटनास्थळी आक्रोश केला.
पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
पंचनाम्यानंतर सायंकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला होता. यावेळी नातेवाइकांची गर्दी झाली होती. चौधरी यांच्यापश्चात पत्नी मीनाक्षी, मुलगा सौरभ, तसेच मुलगी पूजा रडे असा परिवार आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नसून, या प्रकरणी रेल्वे उपस्टेशन प्रबंधक एस.एस. ठाकूर यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.