जामनेर : शहरासह ग्रामीण भागातील २३ सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सातव्या दिवशी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. कांग नदीपात्रात बाप्पांच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदादेखील शासकीय निर्बंधांमुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नेहमीप्रमाणे विसर्जनाची मिरवणूक निघाली नाही की वाद्य वाजले नाही. त्यामुळे वाद्याच्या तालावर भक्तांना नाचताही आले नाही.
नगरपालिकेने निर्माल्य संकलनासाठी पालिका कार्यालयासमोर व नदी काठावर व्यवस्था केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे कांग नदीचे पात्र वाहत असल्याने भक्तांनी नदीपात्रात श्रींची आरती, पूजा करून विसर्जन केले. घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आलेली महिला, लहान मुले ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करताना दिसत होते. नदी काठावर पोलीस व होमगार्ड तैनात होते.
फोटो ओळी
जामनेरला गुरुवारी कांग नदीत गणेशमूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले तर दुसऱ्या छायाचित्रात अडावद (ता. चोपडा) येथे तरुणांनी गुलाल उधळत बाप्पाला निरोप दिला.