चाळीसगाव : अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे तितूर नदीकाठाजवळ असलेल्या अनेक घरांची पडझड होऊन संसारोपयोगी वस्तू, साहित्य, कपडे, अन्नधान्य व इतर महत्त्वाच्या वस्तू पुरात वाहून गेल्या आहेत. एवढ्या कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यांदेखत नेस्तनाबूत झाला. अशा भयानक स्थितीत चाळीसगाव शहरातील जहागीरदार वाडीतील मोलमजुरी करणाऱ्या एका कारागिराचे या पुरात घरातील सर्व साहित्य, समान वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. आता उदरनिर्वाहाबरोबरच निवाऱ्याचे काय, असा प्रश्न या कुटुंबाला सतावत आहे.
बामोशीबाबा दर्गाच्या पाठीमागे असलेल्या जहागीरदार वाडीत राहणारे सुनील सुरेश शिंदे हे बांधकाम व्यवसायात मजुरीचे काम करतात. त्यांना तीन मुली असून त्या शिक्षण घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच आहेत. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, ते आता निराधार झाले आहेत. त्यात ही परिस्थिती त्यांच्यापुढे उद्भवली आहे. आता हातावर पोट असलेल्या या कुटुंबाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी व तितूर-डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे सुनील सुरेश शिंदे यांच्या घरात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानकपणे डोक्यापर्यंत पाणी घुसले. या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने जीव वाचवण्यासाठी हे कुटुंब घराबाहेर पडले. पूर ओसरल्यानंतर घराची अवस्था पाहून घरात जाण्याची त्यांच्यात हिंमत होत नव्हती. घरातील संसारोपयोगी वस्तू, साहित्य, कपडे, अन्नधान्य पाण्यात वाहून गेले. घरात पाणी, चिखल साचल्याची अवस्था पाहून सुनील शिंदे व कुटुंबाला अश्रू अनावर झाले.
जीव वाचला, अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर पडलेल्यांकडे आता दैनंदिन आयुष्यात आवश्यक असणाऱ्या कोणत्याही जीवनावश्यक गोष्टी नाहीत. अशी परिस्थिती प्रत्यक्षात पहायला मिळाली. स्वतःचा निवारा हरवलेला असताना आपण मोठ्या संकटात सापडल्याने एकटेपण त्यांच्यात जाणवत होते.
मदतीच्या ओघामुळे जेवायची चिंता नसली तरी आता जीवनावश्यक वस्तूंसह निवाऱ्याची चिंता त्यांच्यासह अनेकांना भेडसावते आहे. या पुराने आपण निराधार झालो आहोत, असे त्यांना वाटू लागले आहेत.
या घटनेतून झळ बसलेल्या शिंदे कुटुंबाबरोबरच इतर लोक कसे सावरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजंदारीवर मोलमजुरीवर काम करणाऱ्या या कुटुंबावर मोठी भयावह परिस्थिती आली असून, आमच्यावर आभाळ कोसळले आहे, असे ते म्हणतात.
060921\06jal_11_06092021_12.jpg
पुराच्या पाण्यात मोलमजुरी करणाऱ्या सुनिल शिंदे यांच्या कुटुंबाचा संसार रस्त्यावर