नशिराबाद : बकरी ईदच्या नमाज पठणानंतर धार्मिक स्थळी माईकचा ताबा घेत फौजदाराने बेताल वक्तव्य केले आणि संतप्त झालेल्या जमावाने फौजदाराला बदडत महामार्गावर वाहनांवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर.के.नगराळे असे या फौजदाराचे नाव आहे. सकाळी घडलेल्या घटनेने नशिराबादेत तणाव निर्माण झाला आणि जमावाने तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरला. जमावाच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी नगराळेंना निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला. या कारवाईनंतर जमाव पांगला आणि दुपारनंतर नशिराबादचे जनजीवन पूर्वपदावर आले. पोलीस बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला आहे. 1ईदनिमित्त नमाज पठाण झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देत असतानाच नगराळे यांनी मला दोन शब्द बोलायचे आहे, असे सांगत माईकचा ताबा घेतला आणि धार्मिक भावना दुखावणारी बडबड सुरू केली. जमाव भडकला आणि जमावाने फौजदाराला बदडले. त्यानंतर जमाव महामार्गावर पांगला. 2जमाव आक्रमक झाल्याने आरसीपीची एक कंपनी, रॅपिड अॅक्शन फोर्स व स्ट्रायकिंग फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अधीक्षक डॉ.सुपेकर, अपर अधीक्षक ठाकूरही दाखल झाले. तिथेच सुपेकरांनी नगराळेंना निलंबित केले.