जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून यंदाही लाडक्या गणरायाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीस मनाई परवानगी राहणार नसून हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या सोबतच सार्वजनिक मंडळाकरिता मूर्ती ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटांच्या मर्यादेत मूर्ती असावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, महापालिकेचे उपायुक्त प्रवीण पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रबोधनात्मक उपक्रम राबवा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबिर, मतदार नोंदणीबाबत जनजागृतीसारखे विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. त्याचबरोबर या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रमाबरोबर लसीकरण शिबिराचे आयोजन करावे, ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ या उपक्रमांतर्गत मतदार नोंदणी, आजादी का अमृत महोत्सव यासारखे उपक्रम राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.