जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. शिवशाही बसेसही सुरू केल्या आहेत. सध्या नाशिक, पुणे, औरंगाबाद या मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येत असून, प्रवाशांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे मार्च ते मेपर्यंत बससेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर जूनपासून अनलॉक करायला सुरुवात केल्यानंतर, महामंडळातर्फेही टप्प्या-टप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. आता तर शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यामुळे महामंडळातर्फे शिवशाही बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत. जळगाव विभागाकडे महामंडळाच्या मालकीच्या १६ शिवशाही बसेस सुरू असून, त्यापैकी निम्म्या बसेस नाशिक, पुणे, औरंगाबाद या मार्गावर धावत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी या बसेसलाही ऑनलाइन बुकिंगची सुविधा करून देण्यात आली आहे. स्लीपर व सीटर अशा या बसेस असल्यामुळे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
जिल्ह्यातील एकूण आगार : ११
एकूण शिवशाही : १६
सध्या सुरू असलेल्या शिवशाही : ८
इन्फो :
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही
जळगाव : नाशिक
जळगाव : औरंगाबाद
जळगाव : पुणे
जळगाव : मुंबई
इन्फो :
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
महामंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव आगारातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रत्येक बसचे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. बाहेरून बस आल्यावरही सॅनिटायझेशन करण्यात येत असून, यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे बसच्या आतील आसनांवरही सॅनिटायझेशन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे नाशिक, औरंगाबाद, पुणे या मार्गावर शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जसजशी प्रवाशांची मागणी व प्रतिसाद वाढेल, त्यानुसार इतर मार्गावरही शिवशाही बसेस सुरू करण्यात येतील.
- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग