लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला असून, मध्यंतरी महापालिकेत शहराला लागून काही गावे मनपाच्या हद्दीत जोडण्याचा ठराव करण्यात आला होता. एकीकडे शहरातील नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवले जाते आणि दुसरीकडे मात्र शहर हद्दवाढीचे प्रस्ताव ठेवले जात आहेत. तत्कालीन नगरपालिकेत १९८५ मध्ये मनपा हद्दीत समावेश झालेल्या खेडी गावातील रहिवाशांना ३५ वर्षांपासूनही अजूनही नवीन रस्त्यांचा कामांची प्रतीक्षा आहे. ३५ वर्षांत महापालिका प्रशासनाला या भागातील रस्त्यांची कामे करता आलेली नाहीत. यामुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
खेडी गावात एकूण ९ कॉलन्यांचा समावेश होतो. मात्र, या ९ कॉलन्यांमधील रस्त्यांची समस्या आजही ३५ वर्षांत मार्गी लागू शकलेली नाही. गेल्या ३५ वर्षांमध्ये महापालिकेकडून खेडी फाटा ते खेडी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतचा रस्ता गेल्या ६ वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. मात्र, ६ वर्षांत या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. तब्बल २० हजारांहून अधिक नागरिकांचा रहिवास असलेल्या या भागाकडे मनपा प्रशासनाने अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे महापालिकेपेक्षा गावच बरे होते, असे म्हणण्याची वेळ खेडी भागातील नागरिकांवर आली आहे.
गावांमधील रस्ते तरी बरे
मनपाकडून या भागात नवीन रस्ते करणे तर सोडाच, साधी दुरुस्ती देखील मनपाकडून करण्यात आलेली नाही. खेडीमधील ज्ञानचेतना रेसीडेन्सी परिसर, माउलीनगर, हरिओमनगर, श्रीकृष्ण कॉलनी, लोढानगर या भागातील रस्त्यांची स्थिती तर गावातील रस्त्यांपेक्षाही खराब झाली आहे. पाऊस झाल्यानंतर या भागातील रस्त्यांवरून मार्ग काढणे म्हणजे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. विशेष म्हणजे या भागात चार नगरसेवक आहेत. मात्र, एकाही नगरसेवकाकडून या भागातील नागरिकांच्या सुविधांसाठी मनपाकडे पाठपुरावा देखील केला जात नसल्याचे दिसून येते.