दिरंगाई : शासनाकडून मदतीच्या निधीबाबत कुठलेही उत्तर आल्यामुळे विलंब
जळगाव : गेल्या महिन्यात संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणा होऊन १५ दिवस उलटूनही शहरातील फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मिळालेले नाहीत. तर ही मदत वाटपाबाबत निधी मनपाने मंजूर करायचा की शासनाकडून थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, याबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना न आल्यामुळे निधी वाटपाला विलंब होत असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली.
राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गेल्या महिन्यात १५ एप्रिल रोजी राज्य शासनाने राज्यभरात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. तसेच या लॉकडाऊनची आता १५ मे पर्यंत मुदतवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांना शासनाकडून दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. या मदतीच्या घोषणेमुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पंधरा दिवस उलटूनही जळगाव शहरातील एकाही फेरीवाल्याला आर्थिक मदत करण्यात आली नसल्याचे मनपातर्फेच सांगण्यात आले. दुसरीकडे मदत न मिळाल्याने शहरातील फेरी वाल्यांकडून राज्य शासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
निधीच्या वाटपाबाबत मनपा प्रशासनात संभ्रम
राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर, त्याबाबत शासनातर्फे मनपा प्रशासनाला मदत देण्याबाबत पत्रही पाठविण्यात आले. मात्र, ही मदत देण्याबाबत लागणारा निधी मनपाने मंजूर करायचा, की थेट राज्य शासनातर्फे फेरीवाल्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार,याबाबत कुठलीही माहिती या पत्राद्वारे कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासन या निधीच्या मंजुरीबाबत संभ्रमात आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाले या मदतीपासून अद्यापही वंचित आहेत.
इन्फो :
फेरीवाल्यांना आर्थिक मदत करण्याबाबतची योजना ही शासनाची आहे. त्यानुसार शासनातर्फेच ही मदत दिली जाईल. शासनाकडून मदत आल्यावर ती फेरीवाल्यांना दिली जाईल.
सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव, मनपा
इन्फो :
फेरीवाल्यांमध्ये नाराजीचा सूर
शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही, फेरीवाल्यांना ही मदत अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्यामधून या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनुसार आम्ही दिलेल्या वेळेत व्यवसाय करून, नियमांचे पालन करीत आहोत. तरी देखील शासनाकडून अद्याप ही मदत न मिळाल्याने हे सरकार फक्त घोषणाबाज सरकार असल्याचा सूरही फेरीवाल्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.