जळगाव : हृदयविकार, पॅरालिसिस, मधुमेह यांसारखे गंभीर आजार असूनसुद्धा केवळ १० दिवसांत ६० वर्षीय वृद्ध महिला कोरोनावर मात करीत बुधवारी घरी परतली. कस्तुराबाई सुपडू भालेराव असे वृद्ध महिलेचे नाव आहे.
कोरोना हा बरा होणारा आजार आहे. मात्र, त्यासाठी कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तपासणी करून उपचार करून घ्यावेत, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे.
सर्दी, खोकला, ताप ही पारंपरिक सामान्य आजाराची सामान्य लक्षणं. सध्या जीवघेण्या ठरत असलेल्या कोरोनाचीही हीच लक्षणं असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी इच्छाशक्तीच्या जोरावर वयोवृद्धही कोरोनावर मात करू शकतात. ही प्रेरणा देणारी किमया जळगाव येथील कस्तुराबाई सुपडू भालेराव या ६० वर्षीय महिलेने करून दाखवली आहे.
गेल्या २ वर्षांपासून पॅरालिसीस, मधुमेह व हृदयविकार यांसारख्या गंभीर आजाराने त्या त्रस्त आहेत. त्यातच कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच त्यांनी तपासणी केली. २६ एप्रिल रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यांना लागलीच मोहाडी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या अथक प्रयत्नातून कस्तुराबाई आजींनी अवघ्या १० दिवसांत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन तसेच लेवा पाटीदार सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे नियमितपणे सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही पुरविण्यात आले.
वेळेवर उपचार घ्या..
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपण जर वेळेवर आपली चाचणी करून घेतली व नंतर तत्काळ उपचार घेतले तर आपण नक्की कोरोनाला हरवू शकतो, हे कस्तुराबाई यांनी दाखवून दिले. त्या प.वी. पाटील विद्यालयाचे शिक्षक योगेश भालेराव यांच्या आई आहेत. घाबरून न जाता आपली चाचणी वेळेवर करा व शासनाने पुरविलेल्या वैद्यकीय सेवेवर विश्वास ठेवून आपला उपचार वेळेवर करून घ्या, असे आवाहन योगेश भालेराव यांनी केले.