सावदा : लॉकडाऊनमुळे बाजारबंदी असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित बाजारभाव नाही म्हणून हातात पैसा नाही. त्यामुळे कृषीपंपधारकांकडे महावितरणची वीज बिलांची मोठी रक्कम थकबाकी आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाने कृषीपंपधारक योजना २०२० अंतर्गत एकूण थकबाकीपैकी ५० टक्के रकमेत सवलत देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शासनाच्या कृषीपंपधारक योजना २०२० चा फायदा सावदा विभागातील रावेर आणि यावल तालुक्यांतील आठ हजार शेतकऱ्यांनी घेतला आहे. यातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला २२ कोटी रुपये मिळाले आहेत.
सावदा विभागात एकूण २८ हजार कृषीपंपधारक आहेत. त्यांच्याकडे ६६५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील आठ हजार कृषीपंपधारकांना कृषीपंपधारक योजना २०२० प्रमाणे ५० टक्के सवलत मिळाली आहे. वीज वितरण कंपनीला यातून २२ कोटी रुपये मिळाले आहेत. तर उर्वरित २० हजार कृषीपंपधारकांकडे अजून मोठ्या प्रमाणात बाकी आहे.
थकबाकी भरल्यास गावाचा विकास साधता येणार
कृषी वीज धोरण २०२० योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी थकबाकी भरणा केलेल्या रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रांसह विविध समस्या सुटायला मदत होणार आहे.
-------------------------------------
कृषीपंप धोरण योजना २०२० ही शेतकरी हितासाठी आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा व चिंतामुक्त होऊन महावितरणला सहकार्य करावे.
- गोरक्षनाथ सपकाळे, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, सावदा विभाग