भुसावळ : विद्यार्थी व पालकांकडून शैक्षणिक संस्थांनी अतिरिक्त शुल्क वसूल करू नये. विद्यार्थी ज्या सेवांचा वापर करत नाहीत त्या सेवांसाठी शुल्क आकारणी थांबवावी. शिक्षण शुल्क समितीने नव्याने शिक्षण शुल्क निश्चित करावे. बँकांनी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज लागू करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष नीलेश कोलते यांनी केली आहे. याविषयी संबंधित मंत्री व विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती कोलते यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी विद्यार्थी वापरात नसलेल्या सुविधांचे शुल्क कमी करावे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी. केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावे. शासनाने याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.