लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसने इंधन दरवाढीच्या विरोधात शनिवारी सकाळी टपाल कार्यालयासमोर आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाची गोवरी पोस्टाने पाठवली आहे. यावेळी आंदोलनात सहभागी महिलांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मंगला पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. या महिन्यातदेखील २५ रुपये वाढवण्यात आले आहेत. या भाववाढीविरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करून हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी अश्विनी देशमुख, कल्पिता पाटील, सलीम इनामदार, वाय.एस. महाजन, सुमन बनसोडे, सीमा रॉय, आशा येवले, मिनाक्षी चव्हाण, सीमा गोसावी, पूजा पाटील, पुष्पा पाटील, मीनाक्षी शेजवळकर, पूजा नन्नवरे उपस्थित होत्या.
केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
सध्या इंधनाचे दर चांगलेच भडकले आहे. पेट्रोल, डिझेल सोबतच केंद्र सरकारने घरगुती इंधनाचे दर चांगलेच वाढवले आहेत. त्याचा थेट परिणाम किचनच्या बजेटवर होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने टपाल कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणादेखील दिल्या.
१४८ रुपयांचे तिकिट लावून पाठविली गोवरी
राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाची गोवरी निषेध म्हणून पाठवली आहे. त्यासाठी १४८ रुपयांची तिकीटे लावून ही गोवरी पाठवण्यात आली आहे.