रावेर : तालुक्यातील ऐनपूर-सुलवाडी रस्त्याची गंभीर दुरवस्था कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे झाल्याची कैफियत पं.स.चे माजी सदस्य रवींद्र महाजन, पांडुरंग पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडली असता, त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना भ्रमणध्वनीवरून निविदा जादा दराची असल्याने मंत्रालयात मंजुरीसाठी पडून असली तरी तिला मंजुरी मिळेलच. परंतु सोमवारी या रस्त्यावर खडी कोणत्याही परिस्थितीत पडलीच पाहिजे. नाही तर पाटील आले अन् पाटील गेले..! असे होता कामा नये, अशी ताकीदही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान, ऐनपूर, खिर्डी व निंभोरा शेतीशिवारातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी व ऐनपूर वीज उपकेंद्रात २५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्स्फॉर्मर पहूर येथून आणून ऑईलची आमच्याद्वारे तातडीने पूर्तता करून कार्यान्वित करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख योगिराज पाटील, शिवसेना शहरप्रमुख नितीन महाजन, माजी उपसभापती घनश्याम पाटील, डिगंबर पाटील, सुनील पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या करावी लागेल
किसान क्रेडिट कार्डवर कर्ज काढून लावलेल्या केळी फळबाग ऐन कापणीवर असताना भुईसपाट झाल्या. मागील संरक्षित विम्याची रक्कम अद्यापपावेतो मिळाली नाही व आताही नुकसान भरपाई नाही मिळाली तर आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी कैफियत धामोडी येथील एका शेतकऱ्याने रस्त्यात थांबवून पालकमंत्र्यांकडे मांडली.
भाऊ, आमच्या गावाची बातमी टीव्हीवर दिसली नाही
सुलवाडी गावाबाहेर पडताना एका आपद्ग्रस्त शेतकऱ्याने, ‘भाऊ आमचं गाव कोपऱ्यात असल्याने आमच्या गावाची बातमी टीव्हीवर दिसली नाही’, अशी व्यथा मांडली. पालकमंत्र्यांनी, ‘त्यासाठीच तर तुमच्या गावात आलोय भाऊ’, असे आश्वस्त करताच शेतकरी सुखावला.