गुलाबराव पाटील यांनी घेतली दखल
धरणगाव : गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीने ग्राहकांचा विद्युत पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता कापण्याचा धडाका लावला आहे. हे वीज कनेक्शन कापू नका, ग्राहकांना तीन टप्प्यात पैसे भरण्याची संधी द्या, असा आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
धरणगाव तालुक्यातच मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे विद्युत कनेक्शन कापण्यात येत आहेत. याबाबत आज लोकमतने वृत्त दिले. याची दखल घेत गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. त्यात त्यांनी वरील आदेश दिले.
कोरोनाची परिस्थिती तसेच कोरोना काळातील वीज बिल कमी होईल अशी आशा लोकांना होती. यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिल भरले नाहीत. आणि आता थकबाकी वसुलीची मोहीम राबविली जात असतांना अचानकपणे विद्युत कनेक्शन कापण्यात येत आहेत. यासंदर्भात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांना माहिती दिली. वीज वितरणचे कार्यकारी अभियंता आर. एस. पवार यांनी सांगितले की,
थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणगाव तालुक्याची मागील वर्षी १० लाखाची थकबाकी होती. ती यावर्षी सव्वा कोटी रुपयापर्यंत गेली आहे.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी कोणत्याही ग्राहकांचे विद्युत कनेक्शन एकाएकी कापू नका व बिल भरण्यासाठी ग्राहकाला संधी द्या व तीन टप्प्यात
40 :30 :30 याप्रमाणे टप्पे करून बिलाची वसुली करा, असे आदेश दिले. यावेळी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी.एम.पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, नगरपालिकेचे नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वीज वितरणचे कार्यकारी अभियंता आर.एस. एस पवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.जी.रेवतकर व धरणगाव अर्बन युनिटचे कनिष्ठ
अभियंता एम.बी.धोटे आदी उपस्थित होते.
तसेच धरणगावचा पाणी पुरवठ्याचा एक्स्प्रेस फिडरवरून वीजपुरवठा नेहमी खंडित होत असतो. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा उशिराने होतो. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होता कामा नये, असे आदेश याप्रसंगी पालकमंत्र्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.