जळगाव : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेतर्फे शनिवारी सायंकाळी ‘जिल्हा शिक्षक’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातून एक, असे १५ पुरस्कार जाहीर झाले. परंतु, यंदाही पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षक दिनाचा मुहूर्त हुकला असून, विजेत्या शिक्षकांना पुरस्कारासाठी किमान आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिक्षक पुरस्कारांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेत मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ३३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातून प्रत्येक तालुक्यातून एक अशा १५ प्रस्तावांची निवड केली जाणार होती. मुलाखती झाल्यानंतर पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची अंतिम यादी मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविली गेली होती. या मुलाखती जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे, उपशिक्षणाधिकारी डी. एम. देवांग यांनी घेतल्या होत्या. दरम्यान, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या १५ शिक्षकांच्या यादीला मान्यता देऊन ती जाहीर करण्यात आली.
- पुरस्कार विजेते : दिनेश मोरे (मारवड जि.प. शाळा, ता. अमळनेर), मनीषा पाटील (वढवे नवे, ता. भडगाव), नामदेव महाजन (मोंढाळे, ता. भुसावळ), योगेश घाटे (नाडगाव, ता.बोदवड), ओमप्रकाश थेटे (पिंप्रळगाव प्र.दे, ता.चाळीसगाव), सोमनाथ देवराज (वेले आखतवाडे, ता.चोपडा), माधुरी देसले (दोनगाव खुर्द, ता. धरणगाव), पद्माकर पाटील (टाकरखेडा, ता. एरंडोल), मोनिका चौधरी (वडली, ता.जळगाव), माया शेळके (खादगाव, ता.जामनेर), विकास पाटील (टाकळी, ता. मुक्ताईनगर), सुभाष देसले (चिंचपुरे, ता.पाचोरा), सीमा पाटील (हिवरखेडे खुर्द, ता. पारोळा), गजाला तब्बस्सूम सय्यद असगर अली (जि.प. उर्दू मुलांची शाळा क्र. १, ता. रावेर), संदीप पाटील (डांभूर्णी, ता. यावल) या १५ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिक्षक दिनाचा मुहूर्त हुकला
शिक्षक पुरस्काराचे वितरण हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत वितरित व्हावे यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. शिक्षक दिनाची तारीख न मिळाल्याने आठवडाभर हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. मागील वर्षी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. मागील पुरस्कारही यात सोहळ्यात वितरण करण्यात येणार आहे.