अमळनेर : जिल्हा बँकेच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना बोलू न देता आमचे भ्रमणध्वनी म्यूट करून एमडी यांनी स्वतःच मंजूर मंजूर म्हणत ठराव मंजूर केले. असा आरोप तालुक्यातील शिरुड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रा. सुभाष पाटील यांनी
‘लोकमत’शी बोलताना केला.
जिल्हा बँकेची वार्षिक सभा ऑनलाईन झूम ॲपवर घेण्यात आली होती. जिल्ह्यात अंदाजे ७ ते ८ हजार सभासद असताना फक्त १२५ सभासद झूम ॲपवर दिसून येत होते, असे सांगून प्रा. सुभाष पाटील म्हणाले की मागील वर्षी प्रत्येक पिकाला सारखे कर्ज मंजूर करावे अशी मागणी केली होती
त्यावेळी संचालकानी पुढील वर्षी अंमलात आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले तसेच २०१९ ला मंजूर झालेला पीक विमा २५ शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. जिल्हा बँकेच्या विम्यापोटी कमिशन मिळते; मात्र बँक सोसायट्यांना माहिती सादर करण्याचे पैसे देत नाही, त्यामुळे सोसायट्यांची परिस्थिती खराब झाली आहे. जिल्हा बँकेचे एटीएम सुरू करा इतर बँकेचे एटीएम बंद करा, मयताच्या वारसास पन्नास टक्के कर्ज देण्याऐवजी पूर्ण कर्ज द्यावे आदी विषय मांडत असताना आम्हाला म्यूट करण्यात आले बोलू दिले नाही तर त्यांनी ठराव मांडले
तेव्हा सभासदाचे मोबाईल म्यूट करून ठेवले होते. असा आरोप प्रा. पाटील यांनी केला आहे. ही बळीराजाची मुस्कटदाबी असल्याचे ही पाटील यांनी सांगितले.
चौकट
शेतकऱ्यांना कापसाला ४० हजार कर्ज मिळते, ज्वारी मक्याला २८ हजार मिळते, उडीद, मुगाला २४ हजार कर्ज मिळते आणि हे कर्ज पेरणीपूर्वी मे मध्ये मिळते म्हणून शेतकरी जादा कर्ज मिळावे म्हणून कापूस पिकाची नोंद करतो; मात्र नंतर दुसरेच पीक घेतो त्यामुळे त्याला विमा मिळत नाही.