जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तरसोद येथे युवासेना विस्तारक कुणाल दराडे आणि किशोर भोसले यांच्या उपस्थितीत ३० गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच जो पर्यंत ऑफलाईन शाळा सुरू होत नाही, तो पर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च युवासेना महानगरप्रमुख स्वप्निल अशोक परदेशी आणि उपमहानगरप्रमुख सचिन हिवराळे करणार आहे. तसेच या उपक्रमात ५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे ५ शिक्षक आठवड्याचे २ दिवस तरसोद या गावाला जाऊन या विद्यार्थ्यांना ५ वी ते ८ वी या वर्गांचा शिक्षण देणार आहे. युवासेना सरचिटणीस राहुल पोतदार, महानगरप्रमुख विशाल वाणी, उपमहानगरप्रमुख गिरीश सपकाळे, महानगर समन्वयक नीलेश सपकाळे, संकेत कापसे, विद्यापीठ संपर्क अधिकारी अंकित कासार, विभाग अधिकारी अमोल मोरे,चेतन कापसे आदी उपस्थित होते.
१६ हॉकर्सचा माल जप्त
जळगाव- मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून सोमवारी शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ भागात रस्त्यावर व्यवसाय करत असलेल्या १६ हॉकर्सचा माल जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान काही हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद देखील झाले.
नगरविकास मंत्र्याचे आश्वासनांवर कार्यवाही नाही
जळगाव -राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पंधरा दिवसांपुर्वी महापालिकेत आले होते. त्यावेळी मनपाचा आकृतीबंध, सातवा वेतन आयोग, गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येईल असेही शिंदे यांनी आश्वासन दिले होते. मात्र, पंधरा दिवस उलटल्यावरही कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत होताना दिसून येत नाही.