भाजपतील कलह पुन्हा चव्हाट्यावर : स्थायीची सभा नियमित होत नसल्याने दारकुंडेची जाहीर नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपातील सत्ताधाऱ्यांमध्ये असलेले कलह अनेकवेळा चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच महापौर व उपमहापौरपदावरून भाजपत चार गट पडले असताना, आता स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या कामकाजावर भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी नाराजी व्यक्त केली असून, सभापतींकडून नियमितपणे स्थायीच्या सभा घेतल्या जात नसल्याने अनेक कामांना ब्रेक लागत असल्याचा आरोप नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी ‘लोकमत’कडे केला आहे.
मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्याकडून स्थायी समितींच्या सभा नियमितपणे घेतल्या जात नसून, आठवडाभरात ही सभा होणे गरजेचे असताना दोन आठवड्यात ही सभा घेतली जाते. तसेच अनेकवेळा मोठा कालावधी लागत आहे. दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, मनपाकडून काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच रुग्णांच्या दृष्टीने नियोजनासाठी काही निविदा काढण्यात येणार असून, यासाठी स्थायीची मंजुरी लागणार आहे. मात्र, सभापतींकडून ही सभा काढली जात नसल्याने मंजुरी थांबली असल्याची माहिती दारकुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, आधीच्या सभापतींकडून आठवड्यात एक सभा असा पायंडा पाडण्यात आला होता. तोच पायंडा सभापतींनी ठेवावा, अशीही मागणी दारकुंडे यांनी केली आहे.
कोट..
कोरोना वाढत असल्याने त्यासाठी मनपाने कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. मात्र, त्याठिकाणी अजूनही अनेक उपाययोजना करणे बाकी आहे. त्यात अनेक विषयांना स्थायीची मंजुरी घेणे गरजेचे असते. मात्र, स्थायीची सभा होत नसल्याने या मंजुरी थांबल्या आहेत.
-नवनाथ दारकुंडे, नगरसेवक, भाजप
नगरसचिवांकडून विषय आले की लगेच सभा काढली जाते. जर विषयच नसले तर सभा कशी काढणार, आणि गेल्या आठवड्यात सभा झाली होती, अजून आठ दिवसदेखील सभेला झाले नाहीत.
-राजेंद्र घुगे-पाटील, स्थायी समिती सभापती, मनपा