चाळीसगाव : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. पुराच्या पाण्यात अनेक गुरांना जलसमाधी मिळाली. पशुपालक, शेतकरी यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असून, शुक्रवारअखेर यात ४०४ लहान, ६१३ मोठी, अशा एक हजार १७ मृत गुरांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
महापूर आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बाणगाव, खेर्डे, सोनगाव, वाकडी, वाघडू, रोकडे, हातले, जावळे, मजरे, भामरे आदी गावांना बसला आहे. या गावांसोबतच एकूण ४२ गावांमधील शेती पिके व पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे. ४० हून अधिक नागरिकांचे घरासह संसारोपयोगी साहित्य पुराच्या जबड्याने गिळून घेतले.
.......
दावणीचे जित्राब मुके-अबोल अन् शेतकऱ्यांचा हंबरडा
एरवी पशुपालकांना पाहून आनंदाने हंबरडा फोडणारी गुरे मंगळवारी आलेल्या पुराने कायमची गपगार झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. पुरात मृत झालेली गुरे पाहून शेतकरी व पशुपालकांनीच हंबरडे फोडला. हे दुःख भयावह व मन सुन्न करणारे आहे. गत दोन दिवसांत पूरग्रस्त सावरत असून, मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट लावली जात आहे.
.......
चौकट १०१७ मृत जनावरांची लावली विल्हेवाट
पुराच्या आक्राळ-विक्राळ संकटात गायी, म्हशी, बैल, शेळी आदी जनावरे मृत्युमुखी पडली. यात दुभत्या जनावरांचाही समावेश होता. मृत जनावरांचे पंचनामे झाल्यानंतर १०१७ जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
1...काही गावांमध्ये जनावरे फुगल्याने मोठी दुर्गंधी पसरली होती. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. पूरग्रस्तांनी प्रशासनाची वाट न पाहता मृत गुरे जमिनीत पुरली. काही गावांमध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाची कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. पूरग्रस्तांना दिली जाणारी कोणतीही मदत अद्यापपर्यंत पोहोचली नसल्याने ते संतप्त झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
2...वाकडी गावात सर्वाधिक १४४ लहान, तर ३१३ मोठी अशा ४५७ पशुधनाची हानी झाली. रोकडे येथे ३५ लहान, १५२ मोठी, वाघडू येथे लहान ५२, मोठी ३५ मृत जनावरे पुरण्यात आली.
......
इनफो
प्रशासनाने सर्व मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट लावली आहे. काही गावांमध्ये पशुपालकांनी स्वतःहून विल्हेवाट लावली. काही गावांमध्ये प्रशासनाने सहकार्यही केले.
- अमोल मोरे
तहसीलदार, चाळीसगाव
.... इनफो
जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम ग्रामपंचायतीला करावे लागले. कोणतीही मदत शासनाकडून मिळालेले नाही. त्यामुळे पूरग्रस्त हतबल झाले आहेत.
- प्रकाश पाटील
सरपंच, वाकडी, ता. चाळीसगाव