लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चलन नसणे, हरविणे किंवा उपलब्ध नसणे याबाबींमुळे जिल्ह्यातील पाच ग्रामसेवक हे कंत्राटीवरून नियमित होऊनही त्यांची अनामत रक्कम परत मिळण्यास तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. दरम्यान ३३ ग्रामसेवकांची मात्र, ही रक्कम अदा करण्यात आली असून अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा कारभार याबाबतीत सुस्थितीत असल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे.
कंत्राटी ग्रामसेवकांची नियुक्ती करीत असताना त्यांच्याकडून सुरक्षा ठेव म्हणून दहा हजारांची अनामत रक्कम घेतली जाते. तीन वर्षानंतर ते सेवेत कायम झाल्यानंतर त्यांना नियमानुसार ही रक्कम परत द्यावी, लागते. याचा सर्व लेखाजोखा हा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे असतो. गेल्या पाच वर्षात ४९ कंत्राटी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी ३८ जण हे कायस्वरूपी सेवेत नियुक्त झाले आहेत. मात्र, सद्य:स्थितीतही ग्रामसेवकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे चित्र असून एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अधिक गावे असल्याचे चित्र आहे.
३८ ग्रामसेवक नियमित सेवेत
गेल्या अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया होत नसल्याने जिल्हा परिषदेत पदे रिक्त राहत असल्याचे चित्र आहे. त्याच धर्तीवर ग्रामसेवकांचीही पन्नास टक्के पदे रिक्त असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मात्र, काही प्रमाणात कंत्राटी पद्धतीने नियुक्त ३८ग्रामसेवकांना कायस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्यात आले आहेत.
एकूण ग्रामसेवक
१४५
कंत्राटी ग्रामसेवक
१६
चलनाच्या मुद्यामुळे चार ते पाच ग्रामसेवकांची ही अनामत रक्कम परत करणे बाकी आहे. ती तांत्रिक बाब आहे. आपण ३३ ग्रामसेवकांना नियमित करून त्यांच्या अनामत रकमा परत केल्या आहेत. - बाळासाहेब बोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग
आपल्या जिल्ह्यात काहीच ग्रामसेवकांची अनामत रक्कम परत करणे बाकी आहे. हा एक शासकीय कामकाजाचा भाग आहे. मोठ्या अधिकांश ग्रामसेवकांना त्यांच्या अनामत रकमा या मिळालेल्या आहेत. - संजीव निकम, राज्य कार्याध्यक्ष ग्रामसेवक संघटना