जळगाव : व्हॉट्सॲपवर बेस डॉट एपीके नामक फाईल पाठवून भोईटे नगरातील सेवानिवृत्त प्राचार्यांच्या पेन्शनच्या खात्यातून ३६ हजार ७०० रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक फकिरराव साळुंखे असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त प्राचार्यांचे नाव आहे. साळुंखे हे भोईटे नगरात कुटुंबासह वास्तव्यास असून ते धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील एम.के.शिंदे विद्यालयातून प्राचार्यपदावरून २००६ मध्ये सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांची पेन्शनची रक्कम धुळ्यातील एसबीआयच्या मुख्य शाखेतील बँक खात्यात जमा होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांना व्हॉट्सॲपवर अज्ञात व्यक्तीने हायचा मेसेज पाठविला. त्यानंतर एपीके नामक फाईल पाठविली. साळुंखे यांनी ती फाईल ओपन केली असता फाईल ओपन होऊन आपोआप बंद झाली.
उत्तराखंडमधील व्यक्तीच्या खात्यावर रक्कम वर्ग
दरम्यान, ती फाईल आपोआप बंद झाल्यानंतर काही वेळाने साळुंंखे यांना त्यांच्या पेन्शनच्या बँक खात्यातून अनुक्रमे ३ हजार ७००, २० हजार आणि १३ हजार असे एकूण ३६ हजार ७०० रुपये खात्यातून कमी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत जाऊन चौकशी केली असता उत्तराखंड राज्यातील एका व्यक्तीच्या खात्यात त्यांची रक्कम वर्ग झाल्याची माहिती देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच, साळुंखे यांनी गुरुवारी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.