जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जनऔषध वैद्यकशास्त्राच्या एका सहाय्यक प्राध्यापकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते १४ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात असून, रविवारी त्यांचा डेंग्यूचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती आहे.
गेल्या सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.
१२ डेंग्यूसदृश रुग्ण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डेंग्यूसदृश आजाराचे १२ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यात एका डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या डॉक्टरांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टर लक्ष ठेवून असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.