लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवारी झालेल्या एक दिवसीय दौऱ्यात झालेल्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी २५१ कोटींच्या निधीचा मागणी केली असून शिंदे यांनी याला अनुकूलता दर्शविली आहे. या प्रकरणी मुंबई येथे लवकरच बैठक घेण्याची ग्वाही शिंदे यांनी दिल्याने जिल्ह्यातील नागरी विकासाला गती मिळणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी केली. यात प्रामुख्याने जळगाव महापालिकेसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत २०१९ मध्ये १०० कोटींची मंजुरी मिळाली होती; मात्र निधीच उपलब्ध झाला नाही. यातील ४२ कोटींच्या कामाची निविदादेखील निघाली असून ४२ कोटींच्या निधीसह तसेच नगरविकासच्या माध्यमातून जळगाव महापालिकेसाठी १५१ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली.
तसेच मेहरूण तलाव आणि शिवाजी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ५१ कोटी रुपयांच्या निधीचा मागणीदेखील करण्यात आली आहे. तर महापालिकेतील प्रलंबित असणारा गाळेधारकांचा प्रश्न आणि हुडकोच्या कर्जाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीदेखील करण्यात आली.
नशिराबाद येथील नगरपरिदेच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधी मंजूर करावा, चाळीसगाव व जामनेर येथे पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व पंचायतींमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणीदेखील पाटील यांनी केली. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर एकनाथ शिंदे यांनी अनुकूलता दर्शविली असून याबाबत मुंबई येथे लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.