लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिकेच्या मालमत्ता कराची रक्कम वसुल होत नसून, यासाठी मनपाने स्थापत्य एजन्सीला ठेका दिला आहे. तरीही उद्दिष्ठ पुर्ण होत नाही. यासह शिवाजीनगर पुलाचा विषय रेंगाळला असून, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात देखील मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी अपयशी ठरले आहेत. यासह शहरातील विकास कामे देखील थांबली असून, मनपा आयुक्तांच्या ढिसाळ कारभारामुळेच हे कामे थांबली आहेत. त्यामुळे मनपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे.
याबाबत नाईक यांनी महापौर जयश्री महाजन यांना देखील निवेदन सादर केले असून, यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्याचीही मागणी नाईक यांनी केली आहे. मनपा आयुक्तांच्या कारभाराबाबत नाईक यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत देखील नाराजी व्यक्त केली होती. आता थेट अविश्वास ठराव आणण्यासाठीच नाईक यांनी निवेदन दिले आहे.