जळगाव : विश्वरत्न दिव्यांग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशोक मन्साराम बाविस्कर यांनी दिव्यांग, विधवा आणि निराधार यांना पिवळे रेशन कार्ड देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना नुकतेच निवेदन दिले आहे. त्यावर पाटील यांनी ग्रामीण व शहरी भागातील निराधार आणि दिव्यांगांना बीपीएल कार्ड देण्याचे आश्वासन दिले आहे. विश्वरत्न दिव्यांग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशोक बाविस्कर, कल्पना भोई, कुंदन लढ्ढा उपस्थित होते.
धानवड परिसरात विजेचा लपंडाव
जळगाव : धानवड, ता. जळगाव परिसरातील कृषी पंपांसाठीची वीज अनेकदा बंद केली जाते. याबाबत महावितरणचे अभियंता एन.बी. चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने परिसरातील शेतकरी वैतागले आहेत. यावेळी नंदलाल पाटील, अरविंद पाटील, भिकन पाटील, विठ्ठल पाटील, योगेश पाटील उपस्थित होते. १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न न सोडविल्यास अभियंत्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा ॲड. प्रवीण शिंदे यांनी दिला आहे.
मन्यारखेडात कृषीकन्येद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जळगाव : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय येथील कृषी पदविका प्राप्त विद्यार्थिनी हर्षदा प्रकाश अहिरे हिने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी जागरूकता कार्यानुभव या अभ्यास दौऱ्यात मन्यारखेडा येथील शेतकऱ्यांना नुकतेच मार्गदर्शन केले. त्यात माती परीक्षण, कीड व रोग व्यवस्थापन, फवारणीची काळजी यावर मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच शालूबाई पाटील, प्रवीण सोनवणे, बापू पाटील उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस.सी. तायडे, प्रा.एस.एन. पाटील, प्रा. वैशाली राणे यांचे मार्गदर्शन लाभले.