लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : २७ दिवस शांत असलेल्या बोदवड तालुक्यातील एका गावात कोरोनाची अचानक रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन अलर्ट झाले असून या गावात डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या गावातील ९ तसेच जिल्ह्यातील २१ असे एकूण ३० अहवाल येत्या २५ ऑगस्ट रोजी जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात येणार आहे.
जिल्हाभरात कोविडची रुग्णसंख्या घटत असली तरी डेल्टा प्लसचे १३ रुग्ण आढळून आल्याने त्या दृष्टीने प्रशासन सतर्क झाले आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्यानंतर कुठेही रुग्णवाढ किंवा मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही. मात्र, हा विषाणू एकाकडून अनेकांच्या शरीरात प्रवेश करताना त्यात जनुकीय बदल होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे डेल्टा प्लस गंभीर रुप घेऊ शकतो, यावरही अभ्यास सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
प्रयोगशाळेतून प्रशासन दक्ष
पॉझिटिव्हिटी घटल्यानंतरही डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर जीएमसीच्या शासकीय कोरेाना चाचणी प्रयोगशाळेत अहवालांच्या बदलत्या पॅटर्नवर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. दरम्यान, २७ दिवसांपासून शून्यावर असलेल्या बोदवड तालुक्यातील एका गावातील सहा अहवाल अचानक बाधित आढळून येताच सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी तातडीने प्रशासनाला याबाबत कळविले आणि तातडीने या गावामध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले.
९८ जणांची तपासणी ३ बाधित
६ जण १४ ऑगस्ट रोजी अचानक बाधित आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ९८ जणांची तातडीने चाचणी करण्यात आली. यातून ३ जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले. यातील बहुतांश लोकांना डोकेदुखीचा त्रास असल्याचे समोर आले. आधीचे ६ व नंतरचे ३ असे एका गावातील ९ नमुने हे जिनोम सिक्वेसिंगसाठी दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे.