महिंदळे, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पळासखेडे येथील शेतकरी सदाशिव रामचंद्र कोळी (५५) यांनी सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतात पत्राच्या शेडच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. त्यांचा मुलगा शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी गेला असता वडिलांनी गळफास घेतला असल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलीस पाटील ज्ञानेश्वर कोळी यांनी खबर दिल्यावरून, भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास गीते करत आहेत.
सदाशिव कोळी हे गेल्या अनेक दिवसांपासून कर्जाच्या विवंचनेत होते. त्यांच्याकडे खासगी बँकांचे व गावातील असे दहा ते बारा लाख कर्ज होते. त्यामुळे त्यांनी आपली शेतीही गहाण ठेवली होती. यावर्षी पावसाचे प्रमाण परिसरात कमी असल्यामुळे शेतीसाठी मोठा खर्च करूनही पिके चांगली नाहीत व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी दुभत्या गायी घेतल्या. पण दुधातही तोटाच होत असल्यामुळे मुलासाठी व्यवसाय म्हणून बँकेचे कर्ज काढून पिकअप गाडी घेतली; परंतु गेली दोन वर्षे लाॅकडाऊन झाल्यामुळे तोही व्यवसाय अयशस्वी झाला. तेही कर्ज माथी पडल्यामुळे ते गेल्या अनेक दिवसापासून कर्ज कसे फिटेल व माझी गहाण ठेवलेली शेती कशी सुटेल? या विवंचनेत ते फिरत होते.
या विवंचनेत त्यांनी आज सकाळी अनेक गावकऱ्यांशी हसतमुखाने शेवटची चर्चा करत आपल्या शेतात जाऊन ९ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर पळासखेडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलं, पत्नी असा परिवार आहे.
230821\23jal_3_23082021_12.jpg
सदाशिव रामचंद्र कोळी