लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : तरसोद फाटा नजीकपासून ते भुसावळपर्यंत चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, तरसोद फाट्यापासून ते जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी तर महामार्गावरील डांबर उखडल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महामार्ग म्हणजे मृत्यूचा फास म्हटले, तर वावगे ठरणार नाही. जळगाव महामार्गावरील दिवसागणिक वाढत असलेले जीवघेणे खड्डे मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेकदा ओरड होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व प्रशासन त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे. खड्ड्यांमुळे बळी जाऊनही न्हाइचे अधिकारी ढिम्मच आहेत.
महामार्ग असल्याने दिवस-रात्र वाहतूक सुरूच असते. मात्र, वाहन चालकांना खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
महामार्गावर जीवघेणे मोठाले खड्डे वाढू लागले आहे. तरसोदफाटा, मन्यारखेडा फाटा, दूरदर्शन टॉवरसमोरील रस्त्यावर डांबर उखडलेले आहे. नशिराबाद चौपदरीकरणाकडून जळगाव रोडला लागत असताना, मोठा खड्डा जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेजजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून, काही ठिकाणी तर डांबर उखडलेले आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालवणे जिकिरीचे ठरत आहे.
अपघाताचा ठोका वाढला आहे. तत्काळ खड्डे बुजवावे, नवीन डांबराचा थर टाकण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
ढिम्म ‘न्हाइ’ लक्ष देणार कधी?
नशिराबाद येथील महामार्गालगत सर्व्हिस रोड वरती पावसामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर तळे साचलेले आहे. पाणी जायला जागा नसल्यामुळे परिसरातून वाट काढणे वाहन चालकांना जिकिरीचे ठरत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी अनेकदा या बाबत ओरड करूनही न्हाइच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली. कैफियत मांडली. मात्र, त्यावर अद्यापपर्यंत कुठलाही मार्ग निघालेला नाही. पाण्याचे तळे जैसे थेच असल्यामुळे परिसरात आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. ढिम्म ‘न्हाइ’ लक्ष देणार कधी, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.