शेंदुर्णी, ता. जामनेर - रोटवद- कासमपुरा रस्तावरील नाल्यात पुराच्या पाण्यात रिक्षा वाहून गेल्याने शेंदुर्णी येथील दिनेश प्रवीण गुजर (वय १२) या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.याबाबत अधिक वृत्त असे की, शेंदुर्णी तालुका जामनेर येथील होळी मैदान भागातील सार्वजनिक गणेश मंडळ भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्याने केळीची पानं घेण्यासाठी दापोरा येथे शेंदुर्णीचे युवक गेले. ते रिक्षात जात असताना मामाच्या गावाला जाण्यासाठी दिनेश गुजरही रिक्षात गेला होता. दापोरा येथून केळी व केळीचे पान घेऊन येत असताना रोटवद- कासमपुरा नाल्यातील पाण्याचा रात्री अंदाज न आल्याने रिक्षा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली परंतु रात्री झाडाझुडपांचा आधार घेत सुनील गुजर, पांडुरंग गुजर, संदीप गुजर, प्रफुल्ल गुजर, सौरभ गुजर, बंटी गुजर हे झाडांच्या आधाराने सुदैवाने वाचले मात्र रिक्षा या पाण्याच्या प्रवाहात एक किलोमीटरपर्यंत वाहून गेली. या दुर्दैवी अपघातात सरस्वती माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी शिक्षण घेत असलेल्या दिनेश प्रवीण गुजर (वय १२) याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी सुमोर अडीच किलोमिटर अंतरावर आढळला. जामनेर येथे दिनेशचे शवविच्छेदन करण्यात आले़ आतापर्यंत रोटवद- कासमपुरा नाल्यावर या पावसाळ्यात दोन-तीन अपघात झाले असून आणखी हा नाला किती लोकांचा दुदैर्वी घटनेचा साक्षीदार होईल ? असा प्रश्न उपस्थित होत असून वेळीच शासनाने लक्ष घालून या नाल्यावर पूल बांधण्यात यावा व पुढील दुर्घटना टाळाव्यात अशी मागणी होत आहे.
पुराच्या पाण्यात बुडून शेंदुर्णीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 18:00 IST