■ रावेर मतदारसंघात अल्पसंख्याक, मराठा व दलित मतांची मोट बांधून विजयी होण्याचे स्वप्न उराशी घेऊन आखाड्यात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांनी तब्बल ३१ हजार २७१ मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला फटका बसला. पहिल्या यादीत सहयोगी मावळते आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेसची उमेदवारी घोषित करणार्या काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. अटीतटीच्या चौरंगी लढतीत चौधरी यांचा १0 हजाराने पराभव करून जनादेशाने जबर धक्का दिला आहे. भाजपाचे हरिभाऊ जावळे यांना मिळालेल्या १0हजारांच्या मताधिक्यात शिवसेना, मनसे, बसपा या पक्षांच्या १२ उमेदवारांची अनामतही जप्त होण्याचा प्रसंग ओढवला. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे उमेदवारजावळे यांच्याविरुद्ध यावल तालुक्यात मसाकासंबंधी प्रचंड नाराजी आहे. भोरगाव लेवा पंचायतचा कल शिरीष चौधरी यांच्या बाजूने आहे. भाजपनेते एकनाथराव खडसे यांची जावळेंबाबत नाराजी आहे.अशा चर्चांना मोठय़ा प्रमाणात ऊत आला होता. रा.काँ. उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांना मतविभागणीसाठी जैन पितापुत्रांनी रिंगणात दाखल केले आहे. ते स्थानिक उमेदवार नसल्याने त्यांना अल्पसंख्याक समाजाने जवळ करू नये. असा प्रचार करण्यात आला.मात्र मावळते आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाखाली अधिकारी आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरणार्या त्यांच्या नातेवाइकांमुळेच मतदारांनी जावळे यांना स्वीकारल्याचे मानले जात आहे. चौधरी यांच्या पराभवास त्यांचे जवळचेच लोक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात अब्दुल गफ्फार मलिक यांच्या झोळीत केवळ अल्पसंख्याक मतांचाच जोगवा पडल्याचे स्पष्ट झाले. रा.काँ.चे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वाला साद घालत मराठा समाज रा.काँ.कडे वळेल, अशी शक्यता मात्र मतदारांनी फेटाळली आहे. रा.काँ.च्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी रमेश पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पध्र्यांनी कायम जिल्हाध्यक्षपदाची पदोन्नती नको म्हणून ही शक्ती पणाला लावल्याचे स्पष्ट होते. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी बहुल गावांचा पट्टा वगळता शिरीष चौधरी यांना रावेर व यावल तालुक्यातील लेवा पाटीदार बहुल मोठ-मोठय़ा गावांनी साफ नाकारल्याची वास्तवता आहे. अल्पसंख्याक समाजानेही नाकारले. जावळे यांना लोकसभेत उमेदवारी नाकारल्याची सहानुभूती असली तरी मोदी लाटेची ओसरती कडा त्यांना तारणारी ठरली आहे.सन १९९५ मध्ये मधुकरराव चौधरी यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या अँड.याकूब तडवीप्रमाणे पुनरावृत्ती होऊन रा.काँ.चे अब्दुल गफ्फार मलिक यांनी शिरीष चौधरी यांना पराभवाचे दर्शन घडवल्याचे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.